15 जानेवारीला कर्मचाऱ्यांना भरपगारी सार्वजनिक सुट्टी जाहीर; शासनाचे परिपत्रक जारी
राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुरुवार, 15 जानेवारी 2026 रोजी भरपगारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.
ही सुट्टी संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रांमध्ये लागू राहणार असून, त्या भागातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे, सार्वजनिक उपक्रम तसेच बँका यांना ही सुट्टी लागू असेल.
महत्त्वाची बाब म्हणजे, संबंधित महानगरपालिका क्षेत्रातील मतदार जर कामाच्या निमित्ताने इतर ठिकाणी कार्यरत असतील, तरी त्यांनाही ही सुट्टी लागू राहणार आहे, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
तसेच, केंद्र सरकारची कार्यालये, सार्वजनिक उपक्रम आणि बँका यांनाही या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.
सर्व मंत्रालये व विभागांना निर्देश देण्यात आले आहेत की, त्यांनी ही अधिसूचना त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व कार्यालये व संस्थांपर्यंत पोहोचवावी.